
लोकनीती न्युज नेटवर्क
वारजे माळवाडी : संस्कार मंदिर संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय वारजे माळवाडीचा गुणवंत विद्यार्थी आदित्य परब ह्याने डेहराडून, उत्तराखंड येथे संपन्न झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय ज्युडो क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. देशभरातून अनेक स्पर्धेक स्पर्धेत सहभागी झाले होते. ज्यूडो क्रीडा प्रकारातील १००+ वजन गटात आदित्य परबने उपउपांत्य फेरीत हरियानाच्या खेळाडूचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत पंजाबच्या खेळाडू कडून पराभव झाला परंतु निराश न होता त्याने तृतीय क्रमांकाच्या फेरीमध्ये हरियानाच्या खेळाडूचा पराभव करत कांस्यपदक पटकावले. आदित्य परबला रचना धोपेश्वर व सुशील गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते आदित्यचा सत्कार करण्यात आला.

दत्तात्रय भरणे यांनी उज्ज्वल यशाबद्दल आदित्य परबचे व संस्कार मंदिर संस्थे महाविद्यालयाचे अभिनंदन केले. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयीन विद्यार्थानी आदित्यचा आदर्श घ्यावा असे ते म्हणाले. पुढील काळात होणा-या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळेस दिले. संस्कार मंदिर संस्थेचे अध्यक्ष व पुण्यनगरीचे मा.उपमहापौर दिलीप बराटे यांनी आदित्यच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. महाविद्यालयीन विद्यार्थांनी राष्ट्र उभारणीत योगदान देणे गरजेचे आहे असे मत दिलीप बराटे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी संस्कार मंदिर संस्थेचे महाविद्यालय प्रभारी प्राचार्य डाॅ.राजेंद्र थोरात, शारीरिक संचालक प्रा अभिजित परसे उपस्थित होते.