
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : शिवणे परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा आठवा वर्धापनदिन कोंढवे गेट येथील दामिनी गार्डन मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. शिवणे, उत्तमनगर, कोंढवे, कोपरे भागातील ज्येष्ठ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय, शिवणे परिसर ज्येष्ठ नागरिक संघ आणि सरपंच नितीन धावडे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये २०० ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी केली.

सायंकाळच्या सत्रात जीवनविद्या मिशन आयोजित उपासना, यज्ञ, संगीत, जीवनविद्या कृतज्ञता सन्मान व मार्गदर्शन सोहळा संपन्न झाला. सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या पॉलिटिव्ह केअर तज्ञ डॉक्टर प्रियदर्शनी कुलकर्णी यांनी यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. वृद्धापकाळात ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावयाची काळजी, शासकीय योजना आणि मनशांती या बाबत डॉक्टर कुलकर्णी यांनी माहिती दिली.

सद्गुरु श्री वामनराव पै यांचे सदशिष्य जीवनविद्या मिशनचे चंद्रकांत निंबाळकर यांचे सुखी जीवनाचे पंचशील या विषयावर व्याख्यान केले. शिवणे परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विद्यमान आमदार भिमराव तापकीर यांचा शाल श्रीफळ तसेच प्रभू रामचंद्राची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला. संघाचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी यांनी संघाची स्थापना त्याची वाटचाल आणि भविष्यातील कल्पना याची माहिती दिली. वर्धापन दिनानिमित्त गायक कलाकार शामला जोशी, प्रसिद्ध कवियत्री ज्योत्स्ना चांदगुडे, गायक कलाकार यशवंत बुचके, बॅडमिंटन खेळाडू अर्जुन पिल्ले, सामाजिक कार्यकर्ते किसन घुले, साहित्यरत्न डॉ गणेश राऊत यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, भाजप सरचिटणीस अरुण दांगट, स्विकृत नगरसेवक सचिन दांगट, युवा नेते अतुल दांगट, ज्येष्ठ शिक्षक शांताराम गाढवे हे आणि मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते