|

विमल विद्या कुंज शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून १०० देशी वृक्षांची लागवड

लोकनीती न्युज नेटवर्क

वारजे : विमल विद्या कुंज, वारजे येथील १९९८ बॅचचे माजी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संयुक्त पुढाकाराने सिप्ला हॉस्पिटल मागील टेकडी, डीपी रोड, वारजे येथे १०० देशी वृक्षांची लागवड करून भव्य वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला. माजी विद्यार्थी दर दोन-तीन महिन्यांनी पुनर्मिलनाचे कार्यक्रम आयोजित करत असतात. यामध्ये सहली, वाढदिवस साजरे करणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग असतो. याच सामाजिक बांधिलकीतून त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून सलग वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला आहे. केवळ झाडे लावून न थांबता, त्याचे वर्षभर संगोपन व निगा राखून झाडे जगवण्यावर भर देण्यात येतो. या वर्षीच्या वृक्षारोपण उपक्रमात मुख्याध्यापिका विमल पटेल यांच्या संकल्पनेतून “एक पेड माँ के नाम, एक पेड मातृशाळा के नाम” ही अनोखी संकल्पना राबवण्यात आली. यामध्ये प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांनी त्यांच्या आईच्या व शाळेच्या नावाने एक झाड लावले.

कार्यक्रमात मुख्याध्यापक शानू पटेल, विमल पटेल, शिक्षक देशपांडे, स्वाती वर्तक, जाधव सर, विवेक शेफाळ तसेच १९९८ बॅचचे माजी विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उभारणारा विमल विद्या कुंज विद्यालयाचा हा उपक्रम निश्चितच इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

इतरांना शेअर करा

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!