|

शिवणेतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्ता रुंदीकरणाला नागरिकांचे सहकार्य..

लोकनिती न्युज नेटवर्क

शिवणे : शिवणे, उत्तमनगर भागात अनेक वर्षांपासून होत असलेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महानगरपालिकेने पाऊले उचलली आहेत. शिवणे गावात सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरीक त्रस्त झाले असून आपले गाऱ्हाणे मांडून देखील काहीच कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल नाराजगी दिसत आहे. शिवणे भागातील शिंदे पूल तसेच नवभारत हायस्कूल जवळील श्री बापूजी बुवा चौक येथे नेहमीच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असतात. त्यावर तोडगा म्हणून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. रस्त्यात उभी केली जाणारी वेडीवाकडी वाहने, विक्री करणारे भाजीवाले तसेच पथारीवाले यामुळे होणारी वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. रस्ता रुंदीकरण करत असताना नागरिकांच्या सुविधेसाठी अनेकांनी रस्ता रुंदीकरणासाठी सहकार्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. महानगर पालिकेचे अधिकारी, आणि जागा मालक चर्चा करून रस्त्याचे काम करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रस्त्याची पाहणी करण्यात आली यावेळी मनपा तर्फे कनिष्ठ अभियंता सीमा सोळंके, माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, सामाजिक कार्यकर्ते अतुल दांगट आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवणे गावातील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यासाठी नागरिकांची रस्ता वाढवण्याची मागणी होती. रस्त्याच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक खांबापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने हे काम आता लवकरच मार्गी लागणार आहे.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!