
लोकनिती न्युज नेटवर्क
अज्ञान आणि गुलामगिरीत अडकलेल्या उपेक्षित समाजाच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश टाकून संपूर्ण आयुष्यचं उजळून टाकले ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी.मानवतेच्या या सूर्याला प्रत्यक्ष पाहिलेल्या एवढेच नाही तर कौतुकाची थाप पाठीवर पडलेले कोंढवे धावडे गावचे सुपुत्र ९५ वर्षीय सादबा मारुती गायकवाड उर्फ आप्पा गायकवाड यांनी आठवणींना दिलेला उजाळा.
शिवणे : कोंढवे धावडे गावचे सुपुत्र सादबा मारुती गायकवाड उर्फ आप्पा गायकवाड यांचा जन्म १९३० च्या काळात झाला, त्यांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये इंग्रजी माध्यमातून तिसरी पर्यंत शिक्षण घेतले होते. लहानपणापासूनच समाजकार्याची आवड असलेले सादबा मारुती गायकवाड यांनी आपले इतर सहकारी कलावंत रामचंद्र गायकवाड, शिवराम गायकवाड, शंकर बनसोडे, धोंडीबा गायकवाड, सीताराम सोनवणे, शिवराम कदम, मल्हारी सोनवणे, गणपत वाघमारे यांनी मिळून १९४७ साली नवभारत जलसा मंडळा मार्फत समाज प्रबोधनाचे कार्य सुरू केले. खेडोपाडी जाऊन जलसाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृती केली. दिवसभर गवंडी काम करुन रात्री सायकलवर प्रवास करावा लागत होता यावेळी कोंढवे धावडे, कोपरे उत्तमनगर, शिवणे गावचे आंबेडकरी समाजातील लोक त्यांच्या बरोबर काम करत होते. देहू रोड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा होणार होती तिथे सभेमध्ये भाषणाच्या अगोदर नवभारत जलसा मंडळ यांना त्यांचा जलसाचा कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली तो जलसाचा कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर सादर केल्यानंतर स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आप्पांच्या पाठीवर थाप मारुन म्हणाले होते की शंभर भाषणाने समाज प्रबोधनाचे जे काम होत नाही ते तुमच्या एका कार्यक्रमाने होत आहे असे म्हणुन पाठीवर शाबासकीची थाप मारत कौतुक केले होते. वयाची नव्वदी पार केलेल्या सादबा गायकवाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा दिला. समाजासाठी केलेल्या कार्यासाठी सादबा गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्काराचे सन्मानित करण्यात आले आहे.