
लोकनिती न्युज नेटवर्क
शिवणे : शिवणे, उत्तमनगर परिसरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या झाली आहे. दिवस, रात्र आता तर दुपारी देखील रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत असल्याचे दिसत आहे. महानगर पालिकेच्या वतीने शिवणे परिसरात रस्ता रुंदीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शिंदे पूल ते अहिरे गेट ह्या दोन किलोमीटर च्या परिसरात रस्त्यावर महावितरणचे अनेक डीपी आहेत, रस्त्याचे रुंदीकरण करत असताना ह्या डीपी मागे हटवणे अथवा सुरक्षित जागी शिफ्ट करणे गरजेचे आहे.
रस्त्याचे काँक्रीटीकरण केले आहे परंतु ह्या धोकादायक डीपी मात्र तशाच ठेवण्यात आल्या आहेत. वेगाने येणाऱ्या वाहनांना रात्री बेरात्री ह्या डीपी दिसल्या नाहीत तर मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. रस्त्याचे रुंदीकरण करून वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईलही परंतु अशा धोकादायक डीपी रस्त्याच्या मधोमध ठेवल्यामुळे नागरिकांच्या जीवाचा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारच्या रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या डीपी लवकरात लवकर सुरक्षित जागी हलवण्यात याव्या अशी मागणी नागरिक करत आहेत