
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : गणित हे अनेक विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक विषय असतो, मात्र काही विद्यार्थ्यांची संख्याज्ञानाची पकड इतकी मजबूत असते की ते अवघड गणिती क्रियाही सहजगत्या सोडवतात. अशाच एका बालगुणवंताची ओळख ध्रुव चौधरीने करून दिली आहे. अवघ्या २ मिनिटे १० सेकंदांत २ ते १० चे पाढे पूर्ण करणाऱ्या ध्रुवने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ध्रुव मुकूल चौधरी ह्याने वयाच्या अवघ्या ५ वर्ष ८ महिने आणि ५ दिवस या वयात २ ते १० चे पाढे अगदीच २ मिनिटे आणि १० सेकंद मधे लिहिण्याचा विक्रम केला आहे. आणि या विक्रमाची “INDIA BOOK OF RECORD” मध्ये नोंद व्हावी यासाठी डी एल एज्युकेशन, देशपांडे अकॅडमी शिवणे येथे २ मार्च २०२५ रोजी व्हिडिओ तयार करण्यात आला. त्यावेळी त्याच्या शिक्षिका शुभांगी घोडराव उपस्थित होत्या.

त्याच प्रमाणे या विक्रमाचे साक्षीदार देशपांडे अकॅडमी चे संस्थापक श्याम लोले व योगेश देशपांडे उपस्थित होते. ध्रुवच्या या बुद्धिमत्तेची आणि कौशल्याची दखल घेऊन त्याच्या शिक्षकांनी तसेच स्थानिक शिक्षणतज्ज्ञांनी त्याचे मनःपूर्वक कौतुक केले आहे. त्याच्या या वेगवान आणि अचूक गणित कौशल्यामुळे तो इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. ध्रुवच्या आई-वडिलांनी सांगितले की, त्याला लहानपणापासूनच गणिताची आवड आहे आणि तो खेळण्याच्या पद्धतीने गणिताचे आकडे सहजगत्या लक्षात ठेवतो. त्याच्या नियमित सरावामुळेच हा विक्रम त्याने प्रस्थापित केला आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अनिता इंगळे यांनी ध्रुवचे विशेष कौतुक केले आहे. ध्रुव चौधरी या वयात गणितीय क्रिया जसे गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज आणि पाढे सहज करू शकतो, ध्रुवच्या या यशाबद्दल परिसरातील अनेक मान्यवर आणि शिक्षकवर्गाने त्याचे अभिनंदन केले असून, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.