|

अन्नपूर्णा परिवारात उत्साहात महिला दिन साजरा – सन्मान आणि सृजनशीलतेचा अनोखा सोहळा!

लोकनीती न्युज नेटवर्क

कर्वेनगर : अन्नपूर्णा परिवारातर्फे महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अन्नपूर्णा परिवाराचे वस्तीप्रतिनिधी व विश्वस्त मंडळ अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते. गरीब महिलांचे व त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक सेवा देऊन सबलीकरण करणे व त्यांना आर्थिक, आरोग्यविषयक व सर्वांगीण विकासासाठी सहाय्य करणे हे अन्नपूर्णा परिवाराचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात अन्नपूर्णाच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. मेधा पुरव-सामंत यांनी सांगितले की या वर्षी अन्नपूर्णातर्फे त्यांच्या सभासदांना पेन्शन देण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.याच प्रसंगी जुन्या सभासद शेवंताबाई खुडे, लिलाबाई ढोक, सुशीला साळेकर, जहिदाबी जलालदीन यांना प्रत्येकी ११ लाख च्या फिक्स डिपॉझिट देण्यात आल्या.

त्यावरील दरमहा व्याज त्यांच्या खात्यात जमा होईल व त्यांचे वृद्धत्व सुरक्षित राहील हेही मेधाताईंनी सांगितले. या कार्यक्रमात अन्नपूर्णा परिवाराचे त्रैमासिक “संवाद”चे प्रकाशन करण्यात आले. यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला वर्षाचे ५० वे वर्ष आहे. त्यामुळे विविध ठिकाणी महिला चळवळींनी काय कार्य केले आहे, याची समग्र मांडणी विविध लेखकांनी संवादच्या अंकामध्ये केली आहे. यामध्ये अन्नपूर्णा परिवाराचे आर्थिक सक्षमीकरणाचे कार्य गेली साडेतीन दशके सुरू आहे याबद्दल प्राची बापट यांनी लेख लिहिला आहे. तसेच मिळून साऱ्याजणी या चळवळीबद्दल गीताली वि. म. यांची मुलाखत दिलेली आहे. स्त्रीमुक्ती संघटनेबद्दल अरुणा बुरटे यांनी विशेष लेख लिहिला आहे. तसेच समग्र जागतिक महिला चळवळीबद्दल माननीय छाया दातार यांनी लेख लिहिला आहे.

शिवाय स्त्रीमुक्तीच्या कविता, असा विविध रंगी अंक प्रकाशित करण्यात आला. त्यासाठी अन्नपूर्णाचे सर्व विश्वस्त मंडळ व संपादक मंडळाच्या प्रतिनिधी वृषाली मगदूम हजर होत्या. सर्वांनी एकतेची शपथ घेऊन या कार्यक्रमाचा शेवट झाला.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!