
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे – सहकार निवडणूक आयुक्त अनिल कवडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनाथ आणि गरजू मुलींच्या विवाहप्रित्यर्थ विशेष मदत करून एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला. शांतीबन केअर सेंटर, वारजे येथील अनाथ आश्रमातील शिप्रा चव्हाण आणि गरजू कुटुंबातील तृप्ती साळुंखे, रा. उत्तमनगर या दोघींना संसारोपयोगी भांडी, साडी, चप्पल आदी साहित्य भेट देऊन त्यांच्या कन्यादानाचा सन्माननीय कार्यभाग त्यांनी पार पाडला. यावेळी बोलताना अनिल कवडे म्हणाले, “गुडविलची टीम सामाजिक भान ठेवून प्रेरणादायी कार्य करत आहे. समाजातील गरजूंना मदत करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

गुडविलच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात प्रकाश पसरवण्याचे कार्य सुरू आहे, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक कौतुक आहे.” गुडविलचे संस्थापक कालिदास मोरे यांनी त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. या प्रसंगी स्वप्नशिल्पचे विवेक विप्रदास व अमर रेणूसे तसेच गुडविलची संपूर्ण टीम उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सर्डीकर तर आभार प्रदर्शन दीप्ती पाटील यांनी केले.