
लोकनीती न्युज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या ५७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसे पुणे शहराच्या वतीने ५७ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचा शुभारंभ आज शहरातील विविध विभागांमध्ये उत्साहात करण्यात आला. कसबा विभागात फडगेट, चिंचेची तालीम, नातूबाग, खडक पोलीस वसाहत, महाराणा बाग अशा ठिकाणी मनसे कसबा विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण रक्षणासाठी मनसे नेहमीच सक्रिय असून, राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या विधायक उपक्रमाची सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे लावलेली प्रत्येक झाडे जगवण्याची जबाबदारी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली असून, नागरिकांच्या सहकार्याने संकल्पित ५७ हजार वृक्षलागवड पूर्णत्वास नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या उपक्रमात मनसेचे वसंत खुटवड, रवि सहाणे, शंकर भोसले, हृषीकेश करंदीकर, मनीष शितोळे, पर्यावरण तज्ञ बबलू पारेख, राजू पळीवाले, सुरेश सांबार, मनुभाई पारीख आणि ज्योती खुटवड आदी मान्यवर उपस्थित होते.