
लोकनीती न्युज मीडिया
पुणे : नेचर डिलाईट फाउंडेशन आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र सणसवाडी (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे टेकडीवर आंतरराष्ट्रीय योगदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने योगसाधना, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यानधारणा तसेच वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. निसर्गाच्या सानिध्यात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध योगशिक्षक सदाशिव एकसंबे, निवास माळी आणि सोमनाथ वाले यांनी दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व उपस्थितांना पटवून देत योगाचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमात वारजे परिसरातील ज्येष्ठ योगशिक्षिका अर्चना कोपर्डे यांचा नेचर डिलाईट फाउंडेशनच्या वतीने शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी योगाचे आरोग्यदायी महत्त्व स्पष्ट करत फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांची माहिती सुनील बोरावडे यांनी दिली, तर नेचर डिलाईट फाउंडेशनच्या सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती संस्थेचे अध्यक्ष संपत खैरे यांनी उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग तसेच योगप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सचिव संजय गोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.