|

ए के के न्यू लॉ अकॅडमी येथे नवीन उपभोक्ता संरक्षणाच्या पैलू आणि आव्हाने आणि पुढील दिशा या विषयावरील एक दिवसीय ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

लोकनीती न्युज नेटवर्क

पुणे : AKK न्यू लॉ अकॅडमीच्या ग्राहक संरक्षण व सशक्तीकरण केंद्राने ग्राहक वकिली गट, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने “नवीन उपभोक्ता संरक्षणाच्या पैलू – आव्हाने आणि पुढील दिशा” या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली. या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रमुख शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणणे आणि ग्राहक कायद्यांबाबत त्यांचे अनुभव व संशोधन सादर करणे. परिषदेची सुरुवात उद्घाटन सत्राने झाली. यावेळी AKK न्यू लॉ अकॅडमीचे प्राचार्य डॉ सलीम शेख यांनी स्वागतपर भाषण व संकल्पना विषयक सादरीकरण केले. या परिषदेचे प्रमुख पाहुणे मा. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय (गोवा खंडपीठ) होते. आपल्या भाषणात त्यांनी ग्राहक संरक्षणाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांसोबतच मागील कायद्यांमधील त्रुटींवर प्रकाश टाकला. यानंतर अध्यक्षीय भाषण मा. आबिदा पी. इनामदार, अध्यक्ष, MME & RC आणि उपाध्यक्ष, MCE सोसायटी, पुणे यांनी दिले. आपल्या भाषणात त्यांनी न्याय देण्यासाठी कायद्यांची भूमिका आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी यावर भर दिला. परिषदेस दोन आंतरराष्ट्रीय मान्यवर व्याख्याते उपस्थित होते.

ॲड. कॅरोलिना रिओस विलोटा (माजी अध्यक्ष, FIDA आणि संसद सदस्या, कोलंबिया, दक्षिण अमेरिका) त्यांनी ग्राहक संरक्षणाच्या आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींवर मार्गदर्शन केले तर ॲड. चिओमा उको (अध्यक्ष, FIDA अबुजा शाखा व Zest Legal Consults, नायजेरिया, आफ्रिका यांचे मुख्य सल्लागार) यांनी भारतातील आणि नायजेरिया मधील अन्यायकारक व्यापार पद्धती आशिया आणि आफ्रिका खंडातील कायद्यांचे तुलनात्मक अध्ययन या विषयावर आपले विचार मांडले. या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन सादरीकरण सत्र आयोजित करण्यात आले. परिषदेसाठी नवीन उपभोक्ता संरक्षणाच्या पैलू आव्हाने आणि पुढील दिशा हा मुख्य विषय होता, जो १२ उपविषयांमध्ये विभागला गेला. प्रत्येक सत्रासाठी तज्ज्ञ अध्यक्ष होते.या परिषदेसाठी ६० हून अधिक संशोधन पत्रे सादर करण्यात आली आणि पाच वेगवेगळ्या वर्गांमध्ये सादरीकरणे झाली. कार्यक्रमात १०० हून अधिक संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले आणि त्यांनी ग्राहक संरक्षण कायद्यांमधील नवीन प्रगतीवर चर्चा केली, ज्यामध्ये शाश्वत विकासाला विशेष महत्त्व देण्यात आले. परिषदेचा समारोप समारोप सत्राने झाला. या सत्राचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. बिंदू रोनाल्ड, कुलगुरू, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर होते. तसेच डॉ. प्रतापसिंह साळुंके, निबंधक (कार्यभार), महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. जॅसिंटा बास्टियन यांनी केले. उद्घाटन आणि समारोप सत्राचा समारोप डॉ. अतुल झरकर आणि डॉ. भारती शेलके यांनी केला व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. परिषदेच्या समन्वयक म्हणून डॉ. स्वाती शिंदे, डॉ. जॅसिंटा बास्टियन, डॉ. मनीषा अग्रवाल आणि डॉ. भारती शेलके यांनी कार्यभार सांभाळला.

इतरांना शेअर करा

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!