
लोकनीती न्युज नेटवर्क
पुणे : एका जेष्ठ नागरिकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्तेवर बळकाव करण्याच्या हेतूने बनावट मृत्युपत्र तयार करून ते न्यायालयात सादर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नानासाहेब लक्ष्मण वाळवेकर यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, ५ आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४२० (फसवणूक), ४६५ (खोटी कागदपत्रे तयार करणे), ४६७ (महत्त्वाच्या दस्तऐवजांची बनावट), ४७१ (खोट्या दस्तऐवजाचा उपयोग), ४७२ (शिक्के बनवणे), आणि ३४ (सामूहिक उद्देश) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात उघड झाले की आरोपींनी संगणकाद्वारे बनावट मृत्युपत्र तयार केले व त्यावर कै. बाळासाहेब यांची खोटी सही करून ते न्यायालयात सादर केले. मृत्युपत्रासोबत जोडलेले फिटनेस सर्टिफिकेट देखील बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यासाठी डॉक्टरची बनावट सही व शिक्का वापरण्यात आला होता. या प्रकरणातील एक आरोपी गौरव कोल्हापूर यांनी अटक टाळण्यासाठी ॲड. अमेय बलकवडे यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. बचाव पक्षातर्फे ॲड. बलकवडे यांनी युक्तिवाद करताना नमूद केले की, सदर गुन्हा हा दिवाणी स्वरूपाचा असून आरोपीस खोट्या गुन्ह्यात गोवले आहे. यामध्ये गुन्हा दाखल करण्यात ३ वर्षांचा उशीर झाला असून त्याचे समाधानकारक कारण फिर्यादीकडून देण्यात आलेले नाही. तसेच आरोपीचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही व तो तपासास सहकार्य करण्यास तयार आहे. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश हिवसे साहेब यांनी आरोपीस सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड. अमेय बलकवडे, ॲड. मयूर मराठे, ॲड. ओंकार जगताप, ॲड. वैभव हाटकर आणि ॲड. ललित उतमानी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.