
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : श्रीमंत भैरवनाथ तालीम संघ, कोंढवे धावडे यांच्या वतीने शिवजयंती सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर आयोजित करून नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची सुविधा पुरवण्यात आली. तसेच, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची प्रेरणादायी कथा लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी ‘छावा’ या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन करण्यात आले. या शिबिरात अनेक युवक-युवती, तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि समाजासाठी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. “रक्तदान हेच जीवनदान” या संकल्पनेला सन्मान देत, मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान केले.

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्यासाठी दिलेले बलिदान नव्या पिढीला समजावे या हेतूने ‘छावा’ या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या उपक्रमासाठी श्रीमंत भैरवनाथ तालीम संघाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी मंडळाचे संस्थापक वसंत लोले म्हणाले की, भविष्यातही असेच समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील. या संपूर्ण उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.