
लोकनीती न्युज
वारजे : वारजे माळवाडी परिसरात रविवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. पीएमपीएल (PMPML) ची प्रवासी बस ड्रेनेज लाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात अडकली. ही घटना रहदारीच्या वेळेत घडल्याने काही काळ परिसरात मोठा वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र नागरिकांत कमालीचा संताप व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रेनेज लाईनसाठी खोदलेला रस्ता उघड्यावरच सोडण्यात आला होता. काम पूर्ण केल्यानंतर खड्डा बुजवताना योग्य प्रकारची काँक्रीटिंग न करता केवळ माती आणि मुरुम भरून ते उघडे सोडण्यात आले. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे मुरुम वाहून गेले आणि त्या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला. रविवारी सकाळी बस त्या खड्ड्यात अडकली आणि सुमारे तासाभराने क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून दुचाकीस्वारांना तिथून जाताना मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेकजण घसरून पडल्याच्या तक्रारीही स्थानिकांनी केल्या आहेत.

या संदर्भात मनसेचे स्थानिक शाखाध्यक्ष रियाज शेख यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “विकासकामे करताना नागरिकांच्या सुरक्षेचा विचार केला जात नाही. केवळ ठेकेदारांची तुंबडी भरायची आणि कामे उरकायची अशीच सध्या प्रशासनाची भूमिका दिसते. हा प्रकार निषेधार्ह आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,” असे त्यांनी म्हटले. या संपूर्ण प्रकारामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, वारजे माळवाडी परिसरातील नागरिकांनी विकासकामे करताना सुरक्षिततेच्या बाबतीत गांभीर्य बाळगण्याची मागणी केली आहे.