
लोकनीती न्युज
वारजे : भाजपा चित्रपट कामगार आघाडी, पुणे शहर यांच्या वतीने महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस शांतीबन वृद्धाश्रमात उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या मनोरंजनासाठी खास गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बाळकृष्ण नेहरकर आणि चंद्रकांत पंडित यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या सुरेल गाण्यांनी उपस्थितांचे मन जिंकले. संपूर्ण वृद्धाश्रम आनंदाच्या वातावरणात न्हालं होतं आणि अनेक वृद्धांनी मनमोकळा डान्स करत या क्षणांचा आनंद लुटला. कार्यक्रमानंतर वृद्धांच्या हस्ते आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस साजरा करत केक कापण्यात आला. त्यानंतर सर्वांसोबत चविष्ट नाष्ट्याचा आनंद घेण्यात आला. याच दिवशी १०० वृद्ध व्यक्तींसाठी एक महिन्याचा किराणा शांतीबन वृद्धाश्रमाला भेट म्हणून देण्यात आला, ही विशेष बाब सर्वांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी ठरली. हा कार्यक्रम भाजपा चित्रपट कामगार आघाडी पुणे शहर अध्यक्ष राजीव पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास शांतीबन संस्थेच्या संचालिका अनिता देवकर, अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, यशवंत ठोकळ, राकेश सावंत, चेतन गोंडाळ, परशुराम यादव, निलेश पाटील, देविदास शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.