
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : शिवणे देशमुखवाडी येथील यशवंतनगर सोसायटी जवळ गेल्या अनेक दिवसांपासून गटार फुटल्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली असून आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शिवणे गावात ग्रामपंचायत कालावधीत टाकण्यात आलेल्या गटार लाईनवर कालांतराने अनेक इमारती उभ्या राहिल्या असून, त्या सर्व इमारतींचे मैलापाणी एकाच जुनाट गटार लाईनवर जोडले गेले आहे. या गटारमधून इंगळे ओढ्यात सांडपाणी सोडले जाते. मात्र, सतत होणाऱ्या चोकअप मुळे गटारातील मैलायुक्त पाणी सोसायटीच्या परिसरात साचते. यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून डासांचा त्रासही वाढला आहे. सोसायटी मधील लहान मुले आणि वृद्ध नागरिक येथे फिरत असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर देखील ह्या गोष्टीचा परिणाम होत आहे. विशेष म्हणजे, गटाराजवळ साचलेल्या सांडपाण्यामुळे डुकरांचे प्रमाणही झपाट्याने वाढले असून काही दिवसांपूर्वी ह्या परिसरात ९ डुकरे मृत अवस्थेत सापडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंता वाढली आहे. नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. ग्रामपंचायतच्या काळातील पायाभूत सुविधा आता अपुऱ्या पडत आहेत. नव्या वसाहती वाढल्या असल्या तरी गटार व्यवस्था तीच आहे. सोसायटीच्या वतीने जुन्या गटार लाईन ऐवजी नवीन पर्यायी मार्गाने ड्रेनेज व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.