
लोकनिती न्युज नेटवर्क
शिवणे : निवडणुकीच्या रणधुमाळीत आचारसंहिता लागू झाल्यामुळे उपनगरामध्ये लावण्यात आलेले राजकीय जाहिरातीचे मोठ मोठे फलक काढण्यात आले आहेत. फलकांवर कारवाई करत असताना त्याचे उंचच उंच धोकादायक सांगाडे मात्र तसेच ठेवण्यात आले आहेत. कारवाई झाल्यानंतर देखील पुढील फलक लावण्यासाठी हे लाकडी सांगाडे ठेवण्यात आले आहेत का असा प्रश्न नागरिकांच्या वतीने विचारला जात आहे. सध्या जाहिरातीच्या युगात फ्लेक्सचे पेव वाढत असल्याचे दिसत आहे. मान्यवरांचे वाढदिवस, नवीन कार्यालयाचे उद्घाटन अशा अनेक गोष्टींसाठी मोठ मोठे फलक लावण्यात येत आहेत. अशा अनधिकृत फलकांवर कारवाई करत असताना देखील मान्यवरांची मर्जी राखण्यासाठी कार्यक्रम संपेपर्यंत कोणतीही कारवाई केली जात नसून कार्यक्रम संपल्यानंतर फलक काढले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जागोजाग लावण्यात येणारे जाहिरातीचे फलकांमुळे परिसराचे विद्रुपीकरण होत असून मोठ मोठे सांगाडे उभारण्यात येत असल्यामुळे नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. छोट्या दुकानदारांच्या दुकानासमोर ठेवलेले स्टँड, छोटे बोर्ड उचलताना दाखविली जात असलेली तत्परता राजकीय फ्लेक्स काढण्यासाठी दिसत नसल्याची तक्रार नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.