
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : शिवणे गावातील बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांकडून प्रोत्साहन देण्यात आले. पहिल्या पेपरच्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नवभारत हायस्कूल शाळेत यावर्षी मॉडर्न हायस्कूल, मोहोळ विद्यालय, प्रेस्टिज पब्लिक स्कूल आणि नवभारत शाळेचे मिळून एकूण ७०१ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. या विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर घालण्यासाठी ग्रामस्थांनी हा विशेष उपक्रम राबवला. माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, माजी सरपंच सुरेश गुजर, माजी स्विकृत नगरसेवक सदस्य सचिन दांगट, सामाजिक कार्यकर्ते अतुल दांगट, सुहास धावडे यांच्या हस्ते यावेळी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देण्यात आले.

यावेळी उपस्थित शिक्षकांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आत्मविश्वासाने तयारी करण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्य संगीता सावंत, केंद्र संचालक एस डी साबळे, उपकेंद्र संचालक ए एम खुटवड, उपकेंद्र संचालक डी पी वाघमोडे, सहाय्यक केंद्र संचालक पुणेकर यांनी परीक्षा सुरळीत सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन केल्याची माहिती विद्यालयाचे पर्यवेक्षक ए आर खोपडे यांनी दिली.