
लोकनीती न्युज नेटवर्क
कोंढवे धावडे– श्री भुलेश्वर तरुण मंडळाने यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करत शिवजयंतीच्या ३९५ व्या उत्सवाचे भव्य आयोजन केले. विविध कार्यक्रमांनी हा सोहळा गाजला, ज्यामध्ये ऐतिहासिक वारसा, समाजसेवा आणि मातृशक्तीचा सन्मान यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. शिवभक्तांसाठी ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण करण्यात आले, ज्याचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. स्वराज्यासाठी मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताची जाणीव ठेवत मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदाच्या उत्सवात महिला सशक्तीकरणाला विशेष महत्त्व देण्यात आले. मातृशक्तीचा गौरव करत महिलांच्या हस्ते ‘ज्योत ज्योती’ कार्यक्रम पार पडला. तोरणागडावरून आणलेल्या शिवज्योतीचे महिलांनी उत्साहात स्वागत करत अनेक किलोमीटर सामूहिक पायी चालत ही पवित्र ज्योत आपल्या गावी पोहोचवली.

महिलांनी छत्रपती शिवरायांची शिववंदना घेत महाराजांची विधीवत पूजा केली. शिवजयंती सोहळ्याचा धार्मिक व सांस्कृतिक बाजही विशेष लक्षवेधी ठरला. पाळणा कार्यक्रम, शाहिरी पोवाडे आणि व्याख्यानाच्या माध्यमातून शिवचरित्र जागवण्यात आले. तसेच, राष्ट्रवीर संघाच्या वतीने शिवकालीन शस्त्रांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यामध्ये तलवारबाजी, भाला चालवणे, दांडपट्टा यासारख्या युद्धकलेचे थरारक प्रात्यक्षिके सादर करत शिवरायांच्या मावळ्यांची युद्धतंत्रे उलगडण्यात आली. उपस्थितांनी या ऐतिहासिक सादरीकरणाला जोरदार प्रतिसाद दिला. सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने या सोहळ्याला परिसरातील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. शिवभक्तांचा उत्साह आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांचे समर्पण यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला.