
लोकनीती न्युज नेटवर्क
पुणे : समाविष्ट गावांतील वाहतूक समस्या दिवसेंदिवस स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. येथील लोकसंख्या लाखांमध्ये गेली असून त्याच प्रमाणात येथे वाहने देखील वाढली आहेत. वाहतूक समस्या कमी करायची असेल तर सार्वजनिक वाहतूक सेवा वाढवणे गरजेचे आहे. या भागातून पुणे स्टेशन, महानगरपालिका, स्वारगेट, खडकी अशा शहरातील महत्वाच्या ठिकाणी पीएमपीएल ची बस सेवा सुरू आहे. या भागातून ७२ बस दिवसभरात १५० ते २०० ट्रीप करत असतात, असे असताना देखील येथे बस थांबण्यासाठी कोणतीही सोय नाही. पीएमपीएल बस कोंढवा गेट येथे रस्त्यावरच उभ्या केल्या जातात. अरुंद रस्ते आणि वाढलेली वाहने यांमुळे या भागात बस वळवण्यासाठी चालकाला कसरत करावी लागत असते.

कोंढवा गेट येथील दहा नंबर गेट येथे चालक, वाहक तसेच प्रवाशांसाठी शौचालयाची सोय देखील नाही. काही गाड्यांवर चालक किव्वा वाहक म्हणून महिला कर्मचारी असतात त्यांना शौचालय नसल्यामुळे मोठी कुचंबणा होत असते. एकाच जागी दिवसभर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ड्युटी करत असतात लघुशंकेसाठी उघड्या जागेवर जावे लागते, परंतु उघड्यावर लघुशंका केल्यामुळे मनपाच्या वतीने काही बस कर्मचाऱ्यांकडून २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. एकतर शौचालय नाही आणि बाहेर गेले तर दंड केला जात असल्यामुळे कर्मचारी संभ्रमात दिसत आहेत. कर्मचाऱ्यांची शौचालयाची गैरसोय होत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. परिसरात वाढलेली लोकसंख्या आणि वाहनांचे वाढते प्रमाण पाहता कोंढवे धावडे येथील १० नंबर गेट जवळ पीएमपीएल बस डेपो बनवण्यात यावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
आमची मागणी आहे की या भागात होणाऱ्या ऑक्सीजन पार्कच्या ११ एकर जागेमधून २ एकर जागा पीएमपीएल डेपो साठी उपलब्ध करून द्यावी. ज्या ठिकाणी सुसज्ज डेपो बनवून पीएमपीएल च्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय आणि इतर सुविधा देण्यात याव्यात.
निलेश वांजळे
उपाध्यक्ष, आम आदमी पार्टीआम्ही अनेक दिवसांपासून १० नंबर गेट जवळ शौचालयाची मागणी करत आहोत. येथे काही महिला कर्मचारी कार्यरत आहेत ज्या हडपसर ते कोंढवा गेट मार्गावर काम करतात त्यांना २ तासाची ट्रीप असते अशावेळी त्यांना शौचालयाची गरज भासू शकते परंतु येथे शौचालय नसल्याने खूप मोठी समस्या होत असते.
पीएमपीएल कर्मचारी