
लोकनीती न्युज नेटवर्क
पुणे : पुणे येथील लहानग्या विद्यार्थिनीने आपल्या बुद्धिमत्तेचा नवा विक्रम प्रस्थापित करत संपूर्ण राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. वीरा शुभांगी अभिषेक मोरे, वय ९ वर्षे ८ महिने, हिने अवघ्या ३ मिनिटे ३९ सेकंदांमध्ये सुनीता विल्यम्स व त्यांच्या कारकिर्दीविषयी ५० प्रश्नांची अचूक उत्तरे देत ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये आपले नाव कोरले आहे. हा विक्रम तिने केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावरच नाही, तर सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि मार्गदर्शनामुळे गाठला. या अद्वितीय कामगिरीचा गौरव सोहळा पंजाबमधील अमृतसर येथे भव्य पद्धतीने पार पडला. जगभरातून अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. या कार्यक्रमाला वीरा तिच्या आई शुभांगी मोरे व वडील अभिषेक मोरे यांच्यासह सहभागी झाली होती. वीराच्या या विक्रमामुळे शैक्षणिक क्षेत्रात आणि समाजात एक वेगळाच आदर्श निर्माण झाला आहे.

विविध स्तरांमधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शाळा, पालक संघटना, स्थानिक संस्था तसेच शैक्षणिक मंडळांमधून तिच्या कर्तृत्वाचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. विशेषतः विज्ञान आणि अंतराळ विषयातील तिची रुची आणि त्यासाठी तिने घेतलेले ज्ञान कौतुकास्पद ठरत आहे. या यशामागे तिच्या शिक्षकांचे आणि पालकांचे मोलाचे योगदान आहे. या विक्रमासाठी तिला मार्गदर्शन करणाऱ्या शुभांगी घोडराव यांचे मोरे कुटुंबीयांनी विशेष आभार मानले आहेत. वीरा ही आजच्या पिढीतील बालप्रतिभा असून तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.