
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : वारजे ते उत्तमनगर ह्या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस अतिशय गंभीर बनत चालला आहे. शिवणे भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी उपाययोजना म्हणून कॅनॉल रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. परंतु सदर कामासाठी पर्याप्त निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत हा रस्ता होऊ शकत नाही असे सांगण्यात आले असताना इतर ठिकाणी मात्र जिथे रस्ता दुरुस्तीची गरज वाटत नाही अशा ठिकाणी मात्र मनपा प्रशासन कामे करत असताना दिसत आहे. पुणे महापालिकेचा अशी वागणूक खरंच चिंताजनक आहे. जेथे रस्त्याची प्रत्यक्ष गरज आहे, तिथे दुर्लक्ष करणे आणि चांगल्या रस्त्यांवर अनावश्यक कामे करणे म्हणजे विकासाऐवजी साधनांचा अपव्यय वाटत आहे. शिंदे पूल ते गणपती माथा, माळवाडी हा रस्ता चांगला असताना देखील हा रस्ता दुरुस्तीसाठी खरडण्यात आला आहे यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

चांगल्या रस्त्याला लाखो रुपये खर्चून परत दुरुस्ती करण्या ऐवजी ज्या ठिकाणी रस्त्याची खरच गरज आहे अशा ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. शिंदे पूल ते माळवाडी पर्यंत मध्ये मध्ये रस्ता खरडून काढल्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने नागरिकांचा कररुपी पैसा नको तिथे वाया न घालवत त्याचा सदुपयोग करून नागरिकांना सोयी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरीक करत आहेत.
वारजे पासून उत्तमनगर पर्यंत दररोज वाहनांच्या रांगा लागत असतात, त्याला पर्यायी रस्ता म्हणून कॅनॉल रस्ता महत्वाचा होता. प्रशासन निधी नसल्याचे कारण सांगत आहे, निधी नाहीये तर मग आमच्या गावांचा करोडो रुपये टॅक्स कुठे गेला. शिंदे पूल ते गणपती माथा रस्ता चांगला असताना देखील त्याला उखडून त्यावर खर्च केला जात आहे, त्याची काही गरज नव्हती.
मनोज बनसोडे
स्थानिक नागरिक
माळवाडी पासून शिवणे पर्यंत मध्ये मध्ये रस्ता खरडला आहे त्यामुळे त्यावरून दुचाकी चालवणे जिकरीचे झाले आहे, गेल्या दोन दिवसात येथे अनेक जण गाडीवरून पडले आहेत. चांगला रस्ता खरडून त्यावर डांबरीकरण केले जात आहे हा नागरिकांच्या पैशाचा अपव्यय नाही का. एकीकडे निधी नाही म्हणत आहेत आणि दुसरीकडे अशा प्रकारे पैसे वाया घालवत आहेत.
प्रविण लांडगे
सामाजिक कार्यकर्ते