|

शिवराज्याभिषेक दिनी शिवणे येथे ४०५ जणांचे रक्तदान

लोकनीती न्युज नेटवर्क

शिवणे : शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्याने शिवणे गावात सामाजिकतेचा अनोखा नमुना पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अतुल दांगट यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून नवभारत हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही परंपरा सलग १३व्या वर्षीही अखंडपणे सुरू ठेवत, यावर्षी तब्बल ४०५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. यामध्ये युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग नोंदवत समाजसेवेचे उदाहरण घालून दिले. शिबिरात विशेष आकर्षण ठरले ते स्वामी समर्थ महाराजांच्या आकर्षक मूर्तीचे वाटप. प्रत्येक रक्तदात्याला या मूर्ती भेटस्वरूप देण्यात आल्या. या शिबिराला शिवणे गावातील तसेच परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. रक्तदानाच्या कार्याबाबत जागरूकता वाढावी यासाठी स्थानिक तरुणांनीही सक्रिय सहभाग घेतला. गावातील विविध सामाजिक संस्थांनी व कार्यकर्त्यांनी शिबिराच्या आयोजनात मोलाची मदत केली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी युवा नेते अतुल दांगट आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. सलग १३ वर्षे समाजोपयोगी कार्य नियमितपणे करणे ही बाब अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. शिवराज्याभिषेक दिन साजरा करताना केवळ इतिहासाचे स्मरण न करता, समाजासाठी काहीतरी देण्याची भावना यातून ठळकपणे दिसून आली. या उपक्रमामुळे शिवप्रेरणा आणि समाजसेवा यांचा संगम होत असल्याचे मत अनेक नागरिकांनी यावेळी व्यक्त केले.

इतरांना शेअर करा

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!