
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवणे आणि उत्तमनगर परिसरात जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. डोंगरावरून तसेच एनडीए परिसरातून वेगाने वाहत आलेल्या पाण्यामुळे दोन्ही भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले असून, घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी त्रेधा उडाली आहे. पूर्वी डोंगरावरून वाहणारे पाणी कॅनॉलमार्फत बाहेर पडत असे, मात्र सध्या कॅनॉल बुजवल्यामुळे सगळी घाण आणि पाणी थेट रस्त्यावर येत आहे. यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरून लाखोंचे नुकसान झाले आहे. शिवणेतील डॅफोडिल शाळेजवळ तळे साचल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. चिमुकल्यांना पावसाच्या पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून शाळेतील शिक्षकांनी काळजी घेतली. मात्र, पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे चेंबरमधून पाणी ओसंडून रस्त्यावर येत असल्याचे दृश्य दिसून आले. परिसरातील नागरिकांनी या परिस्थितीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वारंवार ही समस्या उद्भवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मनपाचे कर्मचारीही या परिस्थितीपुढे हतबल असल्याचे दिसून येत आहे.