
लोकनीती न्युज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ए.के.के. न्यु लॉ अकॅडमी व पीएच.डी. रीसर्च सेंटर पुणे येथे पिनॅकल २०२५ च्या सतराव्या आंतरविधी महाविद्यालयीन कलागुण महोत्सवांतर्गत स्पर्धांचे आयोजन दि. १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२५ या कालावाधीत करण्यात आले होते. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सदर महोत्सवाचा भव्य पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर समारंभात प्रमुख पाहुणे म्हणुन पुणे पोलीस झोन १ चे पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल व कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून एम सी ई सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाला एम सी ई सोसायटी चे सचिव इरफान शेख, सी.डी.सी., ए.के.के. न्यु लॉ अकॅडमीचे चेअरमन मुझफर शेख हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजक विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सलीम शेख यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. सलीम शेख आपल्या स्वागतपर भाषणात म्हणाले की सदर महोत्सवाचे हे सतरावे यशस्वी वर्ष असून विधी विदयार्थ्यांमधील विविध गुण प्रदर्शनाची सुवर्ण संधी पिनॅकल लॉ फेस्टीवलने विद्यार्थ्यांना दिली आहे. या महोत्सवामध्ये सांस्कृतिक स्पर्धांबरोबरच खेळ व शैक्षणिक स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. सदर महोत्सवामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत विविध विधी महाविद्यालये तसेच भारती विद्यापीठ व सिंम्बॉयसीस विश्व विद्यापीठ व टिळक महाराष्ट विद्यापीठ, डी. वाय. पाटील तसेच इतर १५ महाविद्यालया मधून १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

प्रमुख पाहुणे संदिप सिंह गिल हे आपल्या भाषणात म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वतःच स्वताःला प्रोत्साहीत करणे गरजेचे आहे. अभ्यासावर आपले लक्ष केंद्रीत करातानाच त्यांनी स्वतःमधील कलागुणांना वाव द्यावा व त्या माध्यमातुन आनंद मिळवण्याचा प्रयत्न करावा. कार्यक्रमाच्या अध्यक्षा आबेदा इनामदार यांनी विधी महाविद्यालयातील विदयार्थ्यांच्या गुणाला वाव मिळावा व तो विकसित व्हावा यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मराठवाडा मित्र मंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाने या वर्षाचा ‘पिनॅकल २०२५’ चा विजेता होण्याचा मान मिळवला व या महाविद्यालयानेच पिनॅकल चॅम्पियनशीप करंडक पटकावला. तसेच यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयाने उपविजेते पद पटकावले. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ श्वेता गुप्ता व डॉ. स्वाती शिंदे यांनी केले व डॉ. भारती शेळके यांनी मान्यवरांचे आभार मानले.