
लोकनीती न्यूज मीडिया
शिवणे : अहिरे गेट मनिषा थिएटरच्या मागील लेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध खड्डा पडलेला असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या खड्ड्यामुळे वाहनचालक, विशेषतः दुचाकीस्वार, महिला आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसात या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे गाड्या पाणी उडवत जातात आणि त्यामुळे शाळकरी मुलांचे गणवेश खराब होतात, असा नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

“हे काम लवकर होऊ शकते, पण दुर्लक्षच केले जात आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. याशिवाय या भागात अनेकवेळा लाईटसुद्धा बंद राहत असल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून हा खड्डा बुजवावा आणि रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.