
लोकनीती न्युज मीडिया
कोथरूड : सातारा जिल्ह्यातील कराड येथे पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या “शिवशंभो केसरी महाराष्ट्र” कुस्ती स्पर्धेत बावधन येथील पैलवान रवींद्र कृष्णचंद्र ठाकूर यांनी दमदार खेळी करत मानाची गदा पटकावली. पंजाबच्या बलाढ्य आणि अनुभवी पैलवान अमित कुमार याचा थरारक लढतीत चितपट पराभव करत ठाकूर यांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली. स्पर्धेतील ही सर्वात प्रतिष्ठेची आणि चर्चेची लढत ठरली. राष्ट्रीय स्तरावर आपल्या ताकदीसाठी प्रसिद्ध असलेल्या अमित कुमारकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

मात्र रवींद्र ठाकूर यांनी आक्रमक डावपेच, अफाट ताकद आणि चपळाईच्या जोरावर प्रतिस्पर्ध्याला पूर्णपणे निष्प्रभ केले. “शिवशंभो केसरी महाराष्ट्र” स्पर्धेतील मानाची गदा पटकावत रवींद्र ठाकूर यांनी केवळ स्वतःचेच नव्हे तर महाराष्ट्राच्या समृद्ध कुस्ती परंपरेचे नाव उंचावले आहे. त्यांच्या या दैदिप्यमान विजयामुळे युवा पैलवानांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून कुस्ती क्षेत्रात त्यांच्या कामगिरीची बावधन, पुणे भागात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.