
लोकनिती न्युज नेटवर्क
शिवणे : शिवणे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी
दसऱ्याच्या मुहूर्तावर ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना हवा असलेला विरंगुळा तसेच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करण्यात आल्याचे संघाचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी यांनी सांगितले. आत्तापर्यंत संघात जवळपास दोनशे सदस्य जण जोडले गेले असून एकूण ५०० सदस्य जोडण्याचे उद्दिष्ठ असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. ठराविक वयानंतर किव्वा सेवा निवृत्ती नंतर दिवसभर घरात बसून कंटाळवाणे जीवन न जगता वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी तसेच एकमेकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या सुख दुःखात सहभागी होण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे व्यासपीठ या माध्यमातून मिळणार असल्याचे यावेळी उपस्थित सदस्यांनी सांगितले. राज्यातील सुमारे सव्वा कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना म्हातारपण, बेरोजगारी, आजारपण, विकलांगता यामध्ये संरक्षण मिळेल आणि त्यांचा वृद्धापकाळ सुसह्य होण्यास मदत होईल. ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या वतीने मिळणाऱ्या सोयी सुविधांबाबत माहिती उपलब्ध करून त्यांचा उपयोग करून घेण्याचे उद्दिष्ठ असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उदघाटनप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, उद्योजक शेखर मोरे आणि मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.