
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : शिवणे येथील शिंदे पूल ते नवभारत शाळेजवळील बापूजी बुवा चौक या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे. शाळा पुन्हा सुरू झाल्याने या समस्येत आणखी भर पडली असून विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. मंगळवारी सकाळीच या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. शाळेत पोहोचण्यासाठी घाईत असलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना या कोंडीचा मोठा फटका बसला. याशिवाय कामावर निघालेल्या चाकरमान्यांनाही याचा त्रास सहन करावा लागला. नांदेड गावाकडून येणारी वाहने, तसेच शिवणे गावात वळणारी वाहने यामुळे नवभारत शाळेजवळ एका ठिकाणी प्रचंड गर्दी तयार होते. वाहतूक पोलिसांनी प्रयत्न करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र पाच पोलिसांच्या उपस्थितीतही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. यामागे रस्त्यावर उभी राहणारी वाहने हे एक मुख्य कारण असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेस शाळेच्या आसपास आणि बापूजी बुवा चौकात नियमितपणे वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे. वाहतूक विभागाने लवकरात लवकर योग्य उपाययोजना करून नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा त्रास कमी करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.