|

शिवणे गावचा समाजाभिमुख उपक्रम: बापूजी बुवा उत्सवात प्रसादाऐवजी गरजूंना शिधावाटप

प्रसादा ऐवजी कोरडा शिधा जमा करून गरजूंना वाटप करण्यात येणार आहे

लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : शिवणे गावातील स्वयंभू ग्रामदैवत श्री बापूजी बुवा यांचा वार्षिक उत्सव यंदा अध्यात्मिक भक्तिभावासह समाजभिमुख उपक्रमांतून उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच बापूजी बुवा मंदिरात शिवणे भजनी मंडळाच्या वतीने अभिषेक व काकड आरती पार पडली. मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून श्रद्धा अर्पण केली. यावर्षीच्या उत्सवात ग्रामस्थांनी एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी निर्णय घेतला. दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात प्रसाद बनवण्याऐवजी, त्यासाठी लागणारा कोरडा शिधा जमा करून तो गरजूंना वितरित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यामध्ये गहू, तांदूळ, तूप, डाळी, पीठ, तेल, मसाले अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. जमा झालेला शिधा अनाथ आश्रम तसेच गरीब व गरजू नागरिकांना देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. उत्सवाच्या निमित्ताने समाजहिताचे भान राखत शिवणे ग्रामस्थांनी सुरु केलेला हा उपक्रम आदर्शवत असून, दरवर्षी या नव्या पायंड्याचा अवलंब करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या उपक्रमात अतुल दांगट, विकास दांगट, राहुल दांगट, परेश दांगट, सुरेंद्र कामठे, महेंद्र दांगट, ललित दांगट, विजय दांगट यांच्यासह अनेक ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती आणि योगदान लाभले. शिवणे गावचा हा समाजाभिमुख उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.

इतरांना शेअर करा

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!