
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : पवित्र रमजान महिन्याची सुरुवात उद्यापासून (२ मार्च) होत असून, मुस्लिम बांधवांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. रमजान हा इस्लाम धर्मातील सर्वांत पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यात रोजे (उपवास) ठेवले जातात. शहरातील मशिदी आणि मदरसे नमाजसाठी सज्ज झाले असून, पहिल्या रोजासाठी तयारी सुरू आहे. नमाज, कुराण पठण, तरावीहची विशेष नमाज आणि इफ्तारच्या तयारीसाठी मुस्लिम समाजातील लोकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. रमजान महिन्यात उपवासासोबत दानधर्मालाही विशेष महत्त्व असते. अनेक ठिकाणी मस्जिद मध्ये रोजे ठेवणाऱ्यांसाठी इफ्तार भोजनाचे आयोजन करण्यात येते. पुणे तसेच उत्तमनगर बाजारपेठांमध्येही चैतन्य पाहायला मिळत असून, खजूर, शरबत, सुका मेवा यांची मागणी वाढली आहे. धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या या महिन्याचा समारोप ईद-उल-फित्र या सणाने होतो.

रमजानच्या निमित्ताने समाजामध्ये एकता, सहकार्य आणि भक्तीभाव वाढावा, अशी भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. रमजानमध्ये संयम, दयाळूपणा आणि परोपकार यांना विशेष महत्त्व आहे. खोटे बोलणे, वाईट वागणे, कोणालाही दुखवणे टाळावे, तसेच गरजूंना मदत करावी असे इस्लाम धर्मग्रंथांत सांगितले आहे. यामुळे या महिन्यात समाजसेवेचा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जातो. अनेक संस्था आणि व्यक्ती गरीब आणि गरजूंसाठी इफ्तार भोजन, कपडे आणि आर्थिक मदत पुरवतात. रमजानचा खरा उद्देश आत्मशुद्धी व सदाचार अंगीकारणे हा आहे. यासाठी नमाज, कुराण पठण, ध्यानधारणा आणि दानधर्म यावर भर दिला जातो.