
नितीन गायकवाड
लोकनीती न्युज नेटवर्क
कर्वेनगर – पारंपरिक रूढी-परंपरांना फाटा देत, आईच्या शिकवणीला अनुसरून आणि सामाजिक बांधिलकी जपत प्रा. डॉ. सुरेश श्रवणराव हनमंते यांनी आपल्या दिवंगत मातोश्री स्मृतिशेष शांताबाई श्रवणराव हनमंते यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त समाजोपयोगी काम केले आहे. समाजाच्या विविध घटकांना मदतीचा हात देणारे त्यांचे कार्य एक दिशादर्शक आहे.
दरवर्षी समाजच्या कल्याणासाठी दोन लाखांपर्यंतची मदत करणाऱ्या डॉ. हनमंते यांनी यावर्षी बोधिसत्व रुग्णालयाला एक लाख अकरा हजार रुपये आणि अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत संस्थेला अकरा हजार रुपयांची देणगी दिली. त्यांच्या या योगदानातून समाजातील दुर्बल घटकांसाठी एक नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे.

त्यांच्या सेवाभावी कार्याचा विस्तार केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही. दरवर्षी ते विविध अनाथआश्रमांना दोन महिन्यांचा किराणा, औषधे आणि शैक्षणिक साहित्य पुरवतात. तसेच सामाजिक जागृतीसाठी ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या एक हजार प्रती आणि ‘भारतीय संविधान’ ग्रंथाच्या पाचशे प्रतींचे मोफत वाटप त्यांनी केले आहे.
डॉ. हनमंते यांचे समाजकार्य केवळ देणगीपुरते न थांबता आरोग्य आणि रक्तदान चळवळीच्या माध्यमातूनही समाजासाठी योगदान देत आहे. त्यांच्या ५० व्या वाढदिवशी त्यांनी आपले १०० वे रक्तदान केले. विशेष म्हणजे, त्याच दिवशी त्यांच्या लग्नाचा रौप्यमहोत्सव देखील होता त्यामुळे त्या क्षणाचे औचित्य साधत त्यांनी रक्तदान शिबिर तसेच अन्नदानाचे आयोजन केले.
सामाजिक बांधिलकीचा नवा दृष्टिकोन
डॉ. हनमंते यांचे हे कार्य समाजातील इतर दातृत्वशील व्यक्तींना प्रेरणा देणारे ठरत आहे. पुण्यतिथीला केवळ पारंपरिक विधी न करता समाजोपयोगी उपक्रमांनी आईची आठवण जपण्याचा त्यांचा हा उपक्रम निश्चितच एक नवा सामाजिक दृष्टिकोन घडवणारा आदर्श आहे.
