|

उत्तमनगर येथील आरोग्य उपकेंद्र समस्यांच्या विळख्यात

लोकनीती न्युज नेटवर्क

शिवणे : उत्तमनगर येथील वैद्यकीय उपकेंद्र नेहमीच काही ना काही समस्यांनी ग्रासलेले असते, कधी वीज नाही तर कधी कचरा समस्या तर कधी दारू पिऊन दरवाजात झोपणाऱ्यांचा त्रास. गावे मनपा मध्ये समाविष्ट झाल्यामुळे येथील जिल्हा परिषद अंतर्गत असलेली अनेक आस्थापना मनपा मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. गावे मनपा मध्ये सामाविष्ट करण्यात आली असली तरी देखील काही तांत्रिक त्रुटींमुळे उत्तमनगर येथील वैद्यकीय उपकेंद्र जिल्हा परिषदे अंतर्गतच असून मनपा सुविधांपासून वंचित राहत आहे. गेली दीड वर्षापासून उपकेंद्रातील वीज बिल न भरल्यामुळे येथील वीज कापण्यात आली आहे. येथे मोठ्या संख्येत गरोदर स्त्रिया आणि लहान मुलांचे लसीकरण केले जाते. परिसरातील हजारो गोरगरिब नागरिक येथे मोफत आरोग्य सुविधांचा लाभ घेतात.

वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे येथे अंधारात लसीकरण करण्यात येत होते. गर्मीच्या दिवसात गरोदर स्त्रियांना रांगेत जास्त वेळ थांबल्यामुळे भोवळ येण्याच्या अनेक घटना देखील येथे घडल्या आहेत. महावितरणच्या वतीने वीज पुरवठा खंडित झाल्याचे लक्षात येताच विद्युत विभागाचे अधिकारी पृथ्वीराज मेंढेकर यांनी वैद्यकीय उपकेंद्रात वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तात्काळ वीज पुरवठा सुरू करण्यात आल्यामुळे येथे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय उपकेंद्राच्या समोर असलेल्या गटारी मधून अनेक वेळा मैलापाणी बाहेर येत असते त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे . आरोग्य तपासणी साठी येणाऱ्या नागरिकांना येथे नाकाला रुमाल बांधून थांबावे लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याला सुदृढ करणाऱ्या जागीच अशा प्रकारे दुर्गंधी आणि घाण पसरत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. मनपा आणि जिल्हा परिषदेच्या तांत्रिक बाबींमध्ये मध्ये अडकलेल्या वैद्यकीय उपकेंद्राचा त्रास मात्र सर्व सामान्यांना सोसावा लागत आहे. गोरगरिब जनतेला मोफत उपलब्ध होणारे प्राथमिक उपचार देखील प्रशासकीय अडचणींमुळे अत्यंत अडचणीचे होत असल्याचे दिसत आहे.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!