
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : उत्तमनगर येथील दुय्यम बाजार समितीची तसेच मोकळ्या परिसराची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे दिसत आहे. हवेली तालुक्यामधील गावातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल खरेदी विक्री करता यावा यासाठी बाजार समितीच्या वतीने गाळे बनवण्यात आले होते. परंतु सदर गाळ्यांचा उपयोग शेतकरी तसेच भाजी विक्रेत्यांना न होता जुगारी तसेच मद्यप्राशन करणाऱ्यांनाच जास्त होताना दिसत आहे. मासे आळी भागातून येणाऱ्या गटारी चे मैलापाणी बाजार समितीच्या आवारात सोडण्यात आल्यामुळे सर्वत्र घाण पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. काही ठिकाणी दलदल सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील मुले खेळत असताना एक लहान मुलगा ह्या दलदलीमध्ये अडकल्याची घटना घडली आहे. सुदैवाने मुलाला काही हानी झाली नाही परंतु अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने वेळीच कारवाई करण्याची मागणी नागरीक करत आहेत. सर्वत्र पसरलेल्या घाण पाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण देखील वाढले आहे. उत्तमनगर पोलीस ठाणे अंतर्गत कारवाई केलेली वाहने देखील ह्या जागेत लावली जात आहेत. जवळपास तीन एकरचा करोडो रुपयांचा भूखंड अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेला असून त्यावर अतिक्रमण होण्याचा धोका नाकारता येत नाही. उत्तमनगर भाजी मंडई तसेच रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना सदर जागेत प्रस्थापित केल्यास वारंवार होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल अशी मागणी नागरीक करत आहेत..
सलग वीस वर्ष बाजार समितीवर प्रशासक असल्यामुळे उत्तमनगर बाजार समितीची कामे होऊ शकली नाहीत. आम्ही जागेची पाहणी केली असून शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या खरेदी विक्रीसाठी येथे लवकरच इमारतीचे काम सुरू करण्यात येणार आहे, ज्याचा फायदा हवेली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना होणार आहे. दुय्यम बाजार समितीच्या परिसरात मैलापाणी येत आहे, त्याची स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दत्तात्रय पायगुडे
उपसभापती,
हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती
उत्तमनगर भाजी मंडई मध्ये वर्षोंनवर्ष भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना दुय्यम बाजार समिती मध्ये नाममात्र शुल्क घेऊन गाळे उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी ग्रामपंचायत असताना नावे देण्यात आली होती. यामुळे विक्रेत्यांना हक्काची जागा मिळेल तसेच रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. बाजार समिती मुळे परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत मिळेल.
सुभाष नाणेकर
मा. सरपंच,उत्तमनगर