
लोकनीती न्युज नेटवर्क
उत्तमनगर : उत्तमनगर येथील लिटील माईंड्स फोनिक्स क्लासच्या दोन विद्यार्थीनींनी आपल्या असामान्य कौशल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडत इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स साठी अर्ज दाखल केला आहे. वीरा मोरे हिने वयाच्या ९ वर्षे ८ महिने २६ दिवस असताना सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या कार्याबद्दल विचारलेल्या ५० प्रश्नांची अचूक उत्तरे अवघ्या ३ मिनिटे ३९ सेकंदांत देऊन विक्रम प्रस्थापित केला. तिच्या या उत्कृष्ट स्मरणशक्ती आणि वेगवान उत्तर देण्याच्या कौशल्याने तिला आंतरराष्ट्रीय विक्रमाच्या दिशेने पुढे जाण्याची संधी मिळाली आहे.

दुसरीकडे इशिका दळवी हिने ८ वर्षे ७ महिने २० दिवस या वयात १० ते २ अशी उलट गिनती करत पाढे लिहीण्याचा विक्रम केवळ ४ मिनिटे ५८ सेकंदांत पूर्ण केला आहे. तिच्या गणना कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या विद्यार्थिनींना मार्गदर्शन आणि प्रेरणा देणाऱ्या शुभांगी घोडराव उपस्थित होत्या. त्यांच्या सहकार्यामुळे या विद्यार्थीनींना जागतिक स्तरावर नाव कमावण्याची संधी मिळाली आहे. लिटील माईंड्स फोनिक्स क्लासच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण झाला असून, या विद्यार्थीनींच्या विक्रमाची लवकरच अधिकृत नोंद होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.