
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : येथील नवभारत हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून, गुलाबपुष्प व वह्यांचा संच देत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पावसामुळे हा स्वागत समारंभ शाळेच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता स्पष्ट दिसून येत होती. या स्वागत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार अँड. मोहन देशमुख, नवभारत शाळेचे प्रभारी प्राचार्य शिवराम साबळे, पर्यवेक्षक अंकुश खोपडे, अमर देसाई, रवींद्र गोलांडे, मा. जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल दांगट, तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये नव्या वर्षाबद्दल नवीन उमेद, जिज्ञासा आणि आत्मविश्वास निर्माण करणारा हा स्वागत सोहळा संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिक्षक व कर्मचारी वर्गाचे उपस्थितांनी कौतुक केले.
