
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : शिवणे येथील मनपा शाळेमध्ये शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. पहिल्यांदाच शाळेचा अनुभव घेणाऱ्या बालगोपाळांचे औक्षण करून, फुगे, गुलाब पुष्प, चॉकलेट आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करून विशेष स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अतुल दांगट, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरणाप्पा म्हेत्रे, गणेश पवळ, माता पालक संघ सदस्या तेजश्री आवळे, पर्यवेक्षिका अनिता रेंगडे यांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शाळेचा परिसर स्वच्छ व रंगीबेरंगी फुगे, सजावट आणि सेल्फी पॉईंटसह उत्साहाने नटलेला होता.
विद्यार्थ्यांनी या सेल्फी पॉईंटवर आनंदाने फोटो घेत शाळेतील पहिल्या दिवसाचा आनंद साजरा केला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना अभ्यासात प्रगती करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे, शाळेच्या जुन्या वर्ग खोल्यांच्या दुरवस्थेमुळे यंदा नव्याने चार वर्ग खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यांचे उद्घाटनही याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पार पडले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना वर्गामध्ये पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. त्यांच्या पावलांचे ठसे घेऊन वर्गात प्रवेश घडवण्यात आला. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व खाऊ वितरित करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी वृक्षारोपण करून पर्यावरण जपण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अंजली परिट यांनी केले. सूत्रसंचालन संतोष खैरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सत्यवान मांजरे यांनी केले. शाळेच्या सजावटीचे विशेष श्रेय शिक्षक उमेश गोडसे, कल्याण गुटाळ व वृषाली भालेकर यांना जाते. अशा उत्साहपूर्ण वातावरणात मनपा शाळा शिवणे येथे नव्या शैक्षणिक वर्षाला आनंददायी सुरुवात झाली.
