लोकनीती न्युज नेटवर्क
पुणे : १२ जून, जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त CACL (Campaign Against Child Labour) आणि ARC (Action for the Rights of the Child) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील हडपसर, कर्वेनगर, मुंढवा, निगडी आदी भागांमध्ये विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांत वस्तीमधील बालकांनीच पुढाकार घेत, रॅली, चित्रकला स्पर्धा, भित्तीपत्रक प्रदर्शन आणि संवाद सत्रांचे आयोजन केले. “काम नको, शाळा हवी!”, “बालमजुरी थांबवा – शिक्षण वाढवा!” अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

कार्यक्रमादरम्यान नागरिकांना बालमजुरी विरोधातील कायदे, मुलांच्या शिक्षणाचे हक्क आणि त्यांच्या सुरक्षित व सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाबींबाबत माहिती देण्यात आली. मुलांनी चित्रकलेच्या माध्यमातूनही बालमजुरीविरोधातील प्रभावी संदेश मांडले. या उपक्रमांचा मुख्य उद्देश समाजात बालमजुरी विरोधात सजगता निर्माण करणे, मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा होता. वस्तीतील पालक व नागरिकांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकार्याचे वचन दिले.