
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : पहलगाम येथे पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ शिवणे-उत्तमनगर येथे भव्य निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या हल्ल्यात अतिरेक्यांनी धर्म विचारून निर्दोष नागरिकांवर हल्ला केल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, विविध ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर समाजात धार्मिक तेढ निर्माण करून देशातील शांतता भंग करण्याचा अतिरेक्यांचा हेतू होता. परंतु अशा हिंसक प्रवृत्तींना प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व भारतीयांनी एकत्र येत एकतेचा संदेश देणे गरजेचे असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खडकवासला अध्यक्ष उमेश कोकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. या रॅलीमध्ये हिंदू-मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. “पाकिस्तान मुर्दाबाद”, “करारा जवाब मिलेगा”, “आम्ही सर्व भारतीय शांततेसाठी एकत्र” अशा घोषणा देत उपस्थितांनी आपला संताप व्यक्त केला. ही रॅली एकतेचा आणि शांततेचा संदेश देणारी ठरली.