
लोकनीती न्युज नेटवर्क
वारजे : “हेच चिमुकले हात घडवतील उद्याचे भविष्य” या आशयाच्या प्रेरणादायी विचारातून कै. ह.भ.प. रामचंद्र पाटलू चौधरी प्राथमिक विद्यालय, मनपा शाळा क्रमांक २०५ बी, वारजे येथे नवागत विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस अतिशय उत्साही आणि संस्मरणीय वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात पाय ठेवणाऱ्या प्रत्येक चिमुकल्यासाठी हा दिवस खास व्हावा, त्यांच्या मनात शाळेविषयी आपुलकी निर्माण व्हावी यासाठी संपूर्ण शाळा फुलांच्या माळा, फुगे, रंगीबेरंगी पताका व रांगोळ्यांनी सजवण्यात आली होती. शाळेच्या प्रवेशद्वारावर ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या विशेष दिवशी मा. नगरसेविका लक्ष्मी दुधाने व वृषाली चौधरी, तसेच पुणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर दुदुसकर व कनिष्ठ अभियंता अपर्णा देसाई यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प देत मनपूर्वक स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊ, पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका प्रतिभा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. स्नेहा अग्निहोत्री यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती अधिकाऱ्यांना दिली, तर वर्षा जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले. या विशेष सोहळ्याचा आनंद पालकांच्या चेहऱ्यावरही दिसून येत होता. आपल्या पाल्याचा शालेय जीवनातील हा पहिला दिवस कैद करून ठेवण्यासाठी सेल्फी पॉईंटमध्ये फोटो काढताना आणि पंजाचे ठसे देताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.