
लोकनीती न्युज नेटवर्क
पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त “मानवता सेवा प्रतिष्ठान” यांच्या वतीने भिमफेस्टिवल व युवा पॅंथर सेना नामफलकाचे अनावरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि थाटात पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या महागायिका मंजुषा शिंदे यांनी प्रबोधनात्मक भीमगीते सादर करून संपूर्ण परिसर भारावून टाकला आणि उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास पुणे शहराचे मा. महापौर प्रशांत जगताप, तसेच रुपेश घुले पाटील, दत्ताजी कोल्हे, अनिकेत चव्हाण, खुशाल करंजावणे, मयुर गायकवाड, सागर हगवणे, शिवाजी वाघमारे, नितीन गायकवाड, प्रभू सुनगर, निलेश गायकवाड, अमितराजे गायकवाड, राजेंद्र कांबळे, बाबा गायकवाड, आकाश शिंदे, महादेव खंडागळे, प्रशांत लांडगे, मुकेश शेलार आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब आणि परिवर्तनवादी लढवय्या आमदार जितेंद्र आव्हाड साहेब यांनी एलईडी स्क्रीनवरून व्हिडिओ कॉल द्वारे उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी नव्याने स्थापन झालेल्या “युवा पॅंथर सेना” संघटनेच्या तरुण शिलेदारांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बळ आणि प्रेरणा दिली. युवा पॅंथर सेना संघटनेचे उपाध्यक्ष लखन बाळशंकर यांनी तयार केलेला प्रेरणादायी व्हिडिओ टिझर ही यावेळी सादर करण्यात आला, ज्याने संपूर्ण वातावरण चेतनामय केले. ‘हर जोर-जुल्म के टक्कर में, संघर्ष हमारा नारा है’ हे वाक्य कार्यक्रमाचा घोष वाक्य ठरले. दलित-आंबेडकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्यायहक्कासाठी शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारी “युवा पॅंथर सेना” ही संघटना भविष्यात सामाजिक बदलाचा निर्णायक भाग ठरेल, असा विश्वास युवा पँथर सेनेचे अध्यक्ष हनुमंत शिवुर यांनी व्यक्त केला.